भाषा जपूया
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात जे समोर येईल तसे वागणे , असेल-जमेल ते खाणे , जसे होईल तसे जगणे होत आहे । कारण PRACTICALITY जास्त महत्वाची झालेली आहे । सोप्पा मार्ग निवडून आली वेळ मरून न्यायची आणि स्पीड MAINTAIN करायचा ।
कळून सुध्दा आपल्याला नको तेच आपण वागत आहोत कधी कधी जाणून बुजून इतरांना खुश करण्यासाठी, येणाऱ्या काळात FIT IN होण्यासाठी , निराळे शिकणे , आत्मसतात करणे , आणि तसेच होऊन जाणे हे होत आहे
या सर्वांचा एक परिपोष असा की आपणच आपल्याला विसरून जात आहोत। संस्कृती आणि सभ्यता या दोन निराळ्या गोष्टींमध्ये आपली चूक होत आहे जे खाणे पिणे करतो, जो पेहराव आपण घालतो , ती आपली संस्कृती । दुसऱ्याच्या संस्कृतीचा आदर करणे आणि त्याच्या गोष्टींकडे एका उदार दृष्टिकोनाने पाहणे ही आपली सभ्यता ।
आपले पूर्वज जे वर्षानु वर्षे एकाच ठिकाणी राहत होते त्यांच्या वागण्या बोलण्याची जी तऱ्हा होती ती आपल्यात अनुकरणाने तशीच्या तशी उतरते , त्यास आपण संस्कृती म्हणतो। पण संस्कृती ही प्रादेशिक असते. जर एखादा म्हणूस स्थलांतर करून दुसऱ्या गावी, दुसऱ्या प्रदेशात गेला तर त्याला तिथल्या भाषेशी, हवामानाशी , लोकांशी जुळवून घ्यावे लागते अन्यथा त्याचे जगणे फारच दुःसह होईल।
परंतु त्याने आत्तापर्यंत जे काही शिकले आहे, खाल्ले आहे, जी भाषा बोलला आहे, जसा पेहराव केला आहे, तसा त्याने नवीन जागेत गेल्यानंतरही केला तर तो त्याच्या मनाला आनंद देतो आणि त्याला त्याच्या मूळ संस्कृतीशी जोडून ठेवतो. असे केल्याने त्याच्या संस्कृती ला पाहून त्याचे नवीन मित्र शेजारी पाजारी सुध्दा आवडीने त्याच्या या आनंदात सहभागी होतात, क्वचित आपल्या वागण्यात आणि जगण्यात त्या नवीन संस्कृतीला जोडून घेतात. अशा प्रकाराने , दोन संस्कृतींचा मिलाप होऊन नवीन चांगले , प्रॅक्टिकल गोष्टीची देवाणघेवाण करणे , पदार्थ वाटून खाणे या सारख्या आनंद वाढवणाऱ्या बाबी वाढीस लागतात.
हे सारे अत्यंत आदरणीय आहे आणि त्याचे स्वागत आहेच. या सोबत एक पायरी पुढे जाऊन मी म्हणेन की थोड्या प्रमाणात हे होती होते तोवर ठीक होते. परंतु आता मात्र सारे जग एकमेकांमध्ये मिसळून जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे आणि तेच खरे चिंतेचे कारण आहे. कारण कोणाचीच संस्कृती शुद्ध PURE राहणार नाही. एका लहान मुलाचे आई , बाबा, आजी, आजोबा, आई कडील आजी आजोबा हे सारे निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्ती असतील आणि निरनिराळ्या देशातील असतील तर त्या मुलाने आपले origin कुठले सांगावे?? कुठली भाषा आत्मसात करावी ?
यासाठी प्रत्येकाने आपली मातृभाषा व पितृभाषा जपली पाहिजे. केवळ मराठी असेच नाही तर कन्नड, गुजराती, हिंदी, तेलगू तामिळ, बंगाली, जी कोणती तुम्ही मातृभाषा आणि पितृभाषा असेल ती तुम्हाला आली पाहिजे.
इंग्लिश हा पर्याय आहे पण तो सर्रास वापरता कामा नये. ती कोणाशीही संभाषण करण्यास योग्य अशी भाषा असल्याने फारच उपयुक्त आहे बऱ्याच देशांत ती मुक्तपणे वापरली जाते. परंतु अगदी सरकारी कामात सुद्धा , रोजच्या कामात सुद्धा जिथली तिथली प्रादेशिक भाषा वापरली गेली तरच ती भाषा जगेल , नाहीतर २ पिढ्यांनंतर भाषा मरेल.
भाषा अशाच मरतात. सर्व सामान्य लोक, जी सर्वात POPULAR भाषा असेल ती भाषा वापरतात. त्यामुळे त्यांची आजी बोलत असलेली भाषा मागे पडत जाते आणि आजी बरोबरच संपते।
आज ही आपली गरज नाही तर जबाबदारी आहे की आपण आपली भाषा रोजच्या व्यवहारात वापरलीच पाहिजे. शाळेत कोणत्याही जा, शिक्षण कुठल्याही माध्यमातून करा, कोणत्याही देशात किंवा प्रदेशात राहा. नवीन कितीही भाषा शिका ,परंतु घरी मातृभाषा व पितृभाषेचा वापर केलाच पाहिजे ।
आपण आपली भाषा जपायालाच हवी, आपली भाषा वापरली तरच भाषा जगेल!!!