अमृताहुनी गोड मराठीभाषा
मराठी भाषा ही अमृतासारखी गोड आहे असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात आणि ते आपली ग्रन्थ रचना मराठीत म्हणजेच प्राकृतिक भाषेत करण्यासाठी उत्सुक होते. हेतू इतकाच कि संस्कृतात लिहिलेली श्रीमद भगवद गीता अगदी सामान्य माणसापर्यंत पोहचावी. आणि हे ईश्वरी तत्व केवळ संस्कृत
जाणणाऱ्या लोकांपाशीच राहू नये. ज्ञानेश्वरी हा एक अभूतपूर्व ग्रंथ आहे. हा वाचताना मराठी भाषा गोड कि माऊलींचे शब्द आणि भाव गोड , कि गीताच गोड , हे ठरवणे फार कठीण होऊन जाते. मराठी भाषेत हा ग्रंथ आल्यामुळे माझी मराठी अगदी प्रेमाने नाहून गेली, असे मला वाटते.
एकनाथ महाराजांचा ग्रंथ काशीच्या प्रकांड पंडितांनी , केवळ प्राकृतिक भाषेतील म्हणजेच मराठी भाषेतील म्हणून वाचायचा नाकारला. परंतु त्याची एक शलाका चाचणी घेण्यात आली. शलाका चाचणी याचा अर्थ, एक पीस ग्रंथात घालू ते पान उघडून वाचले जाई. जर योग्य तर ग्रंथ स्वीकारला जाईल, व त्याला मान्यता प्राप्त होईल, अन्यथा नाही. आश्चर्य म्हणजे , ही चाचणी यशस्वी तर झालीच, पण त्या ग्रंथाची काशीतून मिरवणूक काढण्यात आली. एवढे महान लिखाण या मराठीत झाल्यामुळे, मराठीचा गौरव अधिकच वाढला. तसेच , हे सर्व भगवंताचे ज्ञान सामान्य लोकांपर्यत पोहोचले.
अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी, तुकाराम बुवांनी, एकनाथांनी अनेक प्रकारच्या ओव्या , ग्रंथ , भारुडे हे मराठी भाषेतून लोकांसमोर मांडले आणि त्यांचे प्रबोधन केले. त्याच प्रमाणे मराठी भाषेलाही त्यांच्या या प्रयत्नामुळे सुवर्ण युग प्राप्त झाले.